पक्षीनिरीक्षण, एक छंद…

– श्रीरंग फड़के

पक्षीनिरीक्षण करताना

कोणीतरी म्हटले आहे की निसर्गाची बाग फुलवायला देवाने पक्षीजगत निर्माण केले. पक्षी बघणे हा एक छंद आणि नंतर व्यवसायही होऊ शकतो हे मला पूर्वी खरच वाटायचं नाही. पण आता या क्षेत्रात आल्यानंतर हा केवळ व्यवसाय नसून जगण्याचा एक अविभाज्य भाग होऊन जाईल याची हळूहळू प्रचिती येत गेली. लहानपणी पाखरांची तशी तोंडओळख होती पण संपूर्ण जीवनच पाखरमय होण्यासाठी मला त्यांच्यात बरच नांदावं लागलं. माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्ही गच्चीत झोपत असू.गप्पा,नकला रात्ररात्रभर चालू असायच्या,त्यामुळे वाटायचं की सकाळी उशीरापर्यंत मस्तपैकी झोपायला मिळेल.पण कसलं काय.एकतर उन्हाळ्यात बरच लवकर उजाड़तं.तेही ठीक आहे,निदान पांघरूण तोंडावर घेऊन झोपता येतं. पण बरोब्बर साडेपाचाला एका पक्ष्याची जोड़ी (लालबुडे) वायरीवर बसून कलकलायला लागायची. त्यांचा कलकलाट खूप वाढला की जाग येई.मग काही झोप लागत नसे.ते गेले की आपली शेपटी उड़वत एक अजुन पक्षी (नाचण)यायचा आणि मंजूळ शीळ घालत कितीतरी वेळ गात रहायचा.त्यानंतर दोन इवलुसे रंगीत पक्षी येत (शककरखोरे) आणि तारेवर बसून किलबिलाट करत. माझी झोप केव्हाचीच् उडून गेलेली असे आणि त्यांच्याकडे मी भान हरपुन पाहत रहायचा. नेहमीच्याच् दिसणाऱ्या कावळा,चिमणी,कबूतरापेक्षा हे वेगळे,रंगीत,छान गाणारे पक्षी पाहुन मला त्यांच्यात आवड़ निर्माण होऊ लागली, त्यानंतर कधी मी त्यांच्या मागावर जायला लागला माझं मलाच् कळलं नाही. सुदैवाने माझ्या घरच्यांनाही निसर्गाची आवड़ होती,माझे बाबा त्यांच्या लहानपणी निसर्ग शिबिरात गेलेले होते, त्यांना त्यात काही पाखरांची माहिती मिळाली होती आणि काही वेगळे पक्षी पाहायलाही मिळाले होते त्यामुळे पाखरं पहाण्याचे सुरुवातीचे पाठ मला त्यांच्याकडूनच् मिळाले.

एकदाका तुम्हाला पक्षी पहायचे वेड लागले की त्यातून सुटका नाही. पाखरमाया हे एक प्रकारचे व्यसन आहे,सुटता सुटत नाही लेकाचे! आणि कशाला सोडायचे म्हणा. एकदा का तुम्ही निसर्गाच्या जवळ आलात की त्यातली अनेक गूढे उलगड़त जातात किंवा पाखरं बघणे हा निसर्गातले आविष्कार अनुभवण्यासाठी निर्माण केला गेलेला एक राजमार्ग आहे. कारण तुम्ही फक्त पाखरच् पाहत नाहीत तर त्याबरोबर झाडे,पाने, तऱ्हेतऱ्हेची रंगीत आणि वासाची फुले याचंही निरीक्षण करता. मला आठवतय माझे बाबा नेहमी म्हणायचे “आपल्या सभोवतालीच् इतके पक्षी आहेत की त्यासाठी मुद्दाम कुठे जायची गरजच् नाही. आधी आपल्या आजूबाजूच्या पाखरांकडे फक्त बघ,त्यांची नावे सुरुवातीला पाहून काय करायची आहेत? ते कुठल्या झाडावर किंवा कुठे बसतात ते पहा. त्यांचा रंग बघ,ते कसे ओरड़तात,कुठल्या वेळी इथे येतात ते बघ.त्याचं निरीक्षण कर.” पहिले कित्येक दिवस मी फक्त हेच् करायचा.मग त्यांनी मला पाखरांचं शास्त्रीय नावं आणि अजुन काय काय असलेलं रंगीत पुस्तक आणून दिलं. पुढे जाऊन हे पुस्तक लिहिणारा आमचा देव आणि ते पुस्तक गीता होणारे हे मलातरी कुठे माहीत होतं!

दूसरा पाठ म्हणजे निरीक्षण केलेल्या पाखरांची नावे शोधणे,त्यांच्या शरीराच्या ठेवणीचा,उड्डाणाच्या पद्धतीचा अभ्यास करणे,त्यांची घरटी आसपास शोधणे आणि या सर्वांची नोंद ठेवणे हा असे. साधारण वर्षभर हा अभ्यास करण्यात गेला आणि असं लक्षात आलं की प्रत्येक ऋतूत यांच्या आवाजात,रंगात (बहुतेक करून नारांच्या) काही ना काही बदल होतात. नेहमीच्या चार पक्ष्यांशिवाय कित्येक मनभावन,सुंदर पक्षी आपल्या आसपास आहेत हे त्यावेळी कळले. हे असं निरीक्षण कमालीचं आनंदी आणि समाधानकारक असे. त्यांच्या आवाजावरून आपण त्यांना ओळखू शकतो ही बाब भयंकर आनंद देणारी असे.

नंतर आला तीसरा आणि सर्वात आनंदी पाठ.तो म्हणजे पाखरांमागे भटकणे. डोंगरात,नद्या तलावात,समुद्राजवळ,पठारांवर,वाळवंटात सगळीकडे.त्यासाठी बाबांनी मला अजुन काही पाठ दिले. फिकट कपड़े घालणे,आवाज न करता चालणे आणि इतर निसर्गाची,झाडांची ओळख वैगरे.त्यासोबतच दुर्बीण,टीपणवही मला मिळाली. अशाप्रकारे दुर्बीणीसंगे केलेले पाखरांमागचे दिवस कमालीचे आनंददायी असत,अजुनही असतात.एकदा का हे तीन पाठ मिळाले की आपले आपण पाखरांमागे भटकायला मोकळे. असे अनेक पाठ त्यानंतर मिळाले पण हे बाकीचे पाठ स्वकष्टाने आणि एखादा चांगला मार्गदर्शक असेल तर त्याच्याकडून मिळवावे लागले पण त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की हा छंद किंवा हा अभ्यास न संपणारा आहे. अरे या पक्ष्याची आपल्याला संपूर्ण माहिती आहे आशी फुशारकी आपण मारतो आणि दुसऱ्याच क्षणाला तो आपली परीक्षा घेऊन जमिनीवर आणतो.त्यामुळे पाखरांमागे भटकताना नम्र आणि तितकंच साधं राहिलं तर त्याचा फायदा होतो.

आपल्या देशात पक्ष्यांच्या साधारण चौदाशेवर जाती आहेत,त्या चौफेर विस्तारल्या आहेत. हवामान,ऊंची,पाऊस, वनसंपत्ती ऎसे पाखरांच्या अधिवासाचे घटक आहेत. ज्याला जे जे मानवते ते ठिकाण तो तो पक्षी आपल्या निवाऱ्यासाठी पसंत करतो. काही पक्षी स्थलांतर करतात. काही पाखरे भारतात हिवाळ्यात येतात आणि उन्हाळा सुरु झाला की परततात. तिथल्या कड़क हिवाळ्यापासनं बचाव करण्यासाठी ही पाखरे हिमालयाची अभेद्य रांग ओलांडून इथे येतात. त्यांचा मार्ग वर्षानुवर्षे ठरलेला आहे. काही पक्षी स्थानिक असतात तर काही आंतरदेशीय स्थलांतर करणारेही पक्षी आहेत. प्रत्येक पाखराचा विणीचा काळही वेगवेगळा असतो. काही पक्षी विणीसाठी येतात तर काही विणीसाठी दुसऱ्या भागात जातात.त्यांच्या भ्रमणावर जगात बराच अभ्यास सुरु आहे. त्यांचे आवाज किंवा चिवचिवाटही अभ्यासाचा विषय आहे. काही पक्षी एकापेक्षा जास्त आवाज करतात त्याचप्रमाणे दुसऱ्या पक्षांची नक्कल करणारेही अनेक पक्षी आहेत. आपल्या रानात आढ़ळणारा भृंगराज (Racket-tailed Drongo) हे नकलाकार पखराचे उत्तम उदाहरण आहे.पाखरांचा आहार,रहाणी,रंगमान,पिल्लावळ यांवर अभ्यास करायलाही तितक्याच् संधी आहेत.

हल्ली अनेक तरुण मुले,मध्यमवयीन माणसे पक्षीनिरीक्षण करताना दिसतात. शहरातनं पाखरांविषयी कार्यशाळा घेतल्या जातात. निसर्गफेरीचं आयोजन केलं जातं.पाखरांच्या जाती उपजातींबद्दल अधिक सोप्या भाषेत आणि रंजक माहिती दिली जाते. अनेक ग्रुप देशविदेशात पाखरं बघण्याच्या सहलींचं आयोजन करतात. काही देशांत ‘Bird Fair’ च आयोजन केलं जातं. अशी संमेलने किंवा मेळावे भारतातही होतात. महाराष्ट्रात दरवर्षी पक्षीमित्र संमेलन भरवून पाखरांविषयी सखोल चर्चा केली जाते. पक्षीजागृतीचं काम अनेक माणसं आपापल्या क्षमतेनुसार करत आहेत आणि त्याला मिळणारा प्रतिसाद ही नक्कीच आनंददायी बाब आहे. पक्ष्यांबद्दल अधिक माहिती इंटरनेटवर तर उपलब्ध आहेच्. पाखरांच्या अभ्यासातनं आपल्याला निखळ आनंदच् मिळतो. दूर वाळवंटात,पर्वतात,खाजणात पक्षीनिरीक्षणासाठी गेले असता तिथले स्थानिक लोकजीवन,इतिहास,भूगोल, अधिवास यांचीही आपोआप माहिती मिळत जाते.एखाद्या दुर्मिळ पाखरामागे आपण दिवसरात्र भटकतो,अनेक दिवसांपासन हुलकावणी देणाऱ्या त्याचं शेवटी दर्शन झाल्यावर मिळणारा आनंद,सुख,समाधान शब्दातीत असतं. आपल्या घराजवळ,बागेत,परिसरात अनेक पक्षी नांदत असतात. त्याचं वर्तन,आवाज,पद्धती आपण बसल्याजागी टीपू शकतो.पक्षीनिरीक्षणामुळे आपल्या चित्तवृत्ती जागरूक होतात. सततच्या ताणातून मुक्ती मिळते,खरच किती सुखद पक्षीनिरीक्षण! या अशा निरीक्षणांमुळे आपल्या घरात पाण्याला येणारा पक्षांच्या वेळा आपल्याला कळतात,त्यांच्या सवयी ठाऊक होतात,त्यांचा आहार कळतो. एखादा पक्षी ओरडत असेल तर तो नुसताच् ओरडतोय की एखादा धोका बघुन ओरड़तोय हे ही आपल्याला कळायला लागतं. उन्हाळ्याच्या दिवसांत हिमालयात बघितलेली एखादी पक्षीजात हिवाळ्यात अनेक मैल दूर आपल्या गावी दिसली की कोण आनंद होतो आणि उत्सुकताही जागृत होते.एवढं अंतर पार करुन आलेल्या त्या पाखरांचे मार्ग शोधायची आस लागते.समुद्राकाठी आदल्या वर्षी थंडीत दिसलेला सुरय (tern) पाखरांचा थवा परत या वर्षाच्या थंडीत दिसला की खूप बरं वाटतं. पाखरांत आपण कधी इतके गुंतलो हे कळत देखील नाही. हे इतके अफाट विश्व आहे हे की त्यात उतरणाऱ्याला खोलीचा अंदाजच् येत नाही आणि जितके खोल तुम्ही विहरत जाता तितका जास्त आनंद तुम्हाला मिळत जातो. माणूस साधनामस्त होतो.
पक्षीनिरीक्षण अगदी कोणीही करु शकत. वर सांगितलेले तीन नियम तुम्ही पाळलेत की तुम्हालाही वाटेल की अरेच्चा,किती मस्त आहे अस पाखरांना बघणं!पहिल्यांदा अगदी आपल्या घरापासन सुरुवात केली,आजूबाजूची पाखरं पाहिली, त्यांचा आवाज,रंग,ठेवण(चोच,पाय,पंख,शेपटी) नोंदुन ठेवली,मग बसण्याच्या जागा आणि खाण्याच्या सवयी नोंदवल्या. प्रत्येक नोंदीत तुम्हाला जरा वेगळा अनुभव येईल. त्यासोबत पाखरांचे नाव असलेली पुस्तके,दुर्बीण घेतली की अजून उत्साह येतो.हल्ली मोबाइल मधे पाखरांची ॲप ही उपलब्ध आहेत.हळूहळू इतर परिसरात,बाहेर फिरायला गेलात तर तिथले पक्षी पहावे.त्यांचे फ़ोटो घ्यावे जमल्यास.हा हा म्हणता तुम्ही खाजगी पक्षीनिरीक्षकापासन सार्वजनिक निरीक्षक बनाल.त्यांकडे बघत असताना फिकट रंगाचे कपड़े,शूज ऎसे पोशाख केलेत तर उत्तम.सकाळी आणि कलत्या संध्याकाळी पक्षांची हालचाल जास्त असल्याने माळावर किंवा एखाद्या नदीकाठी गेलात की एखाद्या आडोशाला बसून अधिक नैसर्गिकपणे,त्यांना सावध न करता तुम्ही पक्षी पाहू शकाल.खूप जणांनी न जाता दोन-चार च्या समुहात गेलात तर जास्ती छान पक्षी पाहू शकाल कारण बोलाचाली कमी असेल तेव्हा.पक्षीनिरीक्षणासाठी गृहपाठ अत्यावश्यक आहे.त्या भागातले पक्षी,त्यांचे वर्तन याची अगाऊ माहिती असली तर त्यांचे वर्तन तुम्हाला ओळखीचे वाटेल.लांबवर असणाऱ्या,डोळ्यांनी न दिसणाऱ्या पाखराचा फ़ोटो काढू शकलात तर परत येऊन त्यावर अधिक माहिती मिळवता येईल.घरी किंवा सभोवताली पक्षांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही लाकडी घरटी झाडाला बांधू शकता किंवा त्यांच्यासाठी पाणी ठेऊ शकता.त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याचा मौक़ा जास्ती चांगल्या प्रकारे मिळू शकेल. निसर्गाची बाग फुलवणाऱ्या या पाखरांकडनं तुम्हाला जो आनंदाचा ठेवा मिळतो ना त्याला खरोखर कशाचीही तोड़ नसते.

This Post Has One Comment

  1. शैलेश श्रीकांत देशपांडे

    अगदी मनातलं !!!!
    पक्षी जगत फार अफाट आणि अद्भुत आहे, अभ्यास करायचा ठरवलं तर इतक्या बाबी आहेत की एकेका गोष्टीवर आयुष्य जाईल.
    “हा हा म्हणता तुम्ही खाजगी पक्षीनिरीक्षकापासन सार्वजनिक निरीक्षक बनाल.”…..हा हा हा. ह्या सार्वजनिक पक्षी निरीक्षकांची सध्या पक्ष्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ होत आहे, पक्ष्यांच्या private space मध्ये न जाता पक्षी निरीक्षणाचा आनंद उपभोगूया !

Leave a Reply