गोवा,हे दोन शब्द अनेकांच्या मनात अनेक रुंजी घालतात.कोणाला निळेशार समुद्रकिनारे आठवतात तर कोणाला रेताळ वाळूवर पडलेल्या सुंदर तरुणी.कोणाच्या जीभेवर विविध मासे,मदीरांचे स्वाद रेंगाळतात तर कोणाचे हात मंदिरं आणि चर्चसमोर नतमस्तक होताना दिसतात.कोणाला बोरकरांचे नाजुक शब्द खुलवतात तर कोणाला लोरनाचा मादक आवाज झूलवतो.कोणाला माडांच्या राईतूंन येणारी सागर गाज फुुलवते तर कोणाला फेणी ची नशा भूलवते.गोवा, या दोन शब्दांतच इतकी सारी जादू सामावली आहे.पण काहींना म्हणजे निसर्गोपासकांना अजुन एक वेगळा गोवा माहित आहे,तो सगळ्यांना ठाऊक नाही आणि तशी अपेक्षाही नाही.पश्चिम घाटाच्या हिरव्याकंच रांगा,सुरला वेरल्यासारखे देखणेे घाटमाथे.सावरी,लाड़केचे घनगंभीर वोझर (धबधबे).नेत्रावळी,म्हादई ची गर्द राने,वाघेरी,सोसोगड़सारखे बेलाग गड.ही विविधता पण गोव्याने जतन केलीय.
आमचे ‘Natures Nest’ हे असच एका घाटमाथ्याखाली वसलय.सहा एकरात पसरलेलं निसर्गाचं घरटं जिथे इथल्या निसर्गाने, पाखरांनी,सरीसृपांनी त्यांच्या घरात माणसाचा हस्तक्षेप काही प्रमाणात सहन केलाय.किंबहुना मिसळून गेलेत सगळे एकमेकांत.या मानवनिर्मीत निसर्गघरट्यात आपले स्वागतच होते.’नेचर नेस्ट’चा परिसर फार अप्रतिम आहे.इथे दहा निसर्गकुटी असुन त्या वर्षभर सुरु असतात.इथे राहायला येणारी प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाच्या जवळ असते किंबहुना नसली तरी परतीच्या वेळी इथल्या भव्य निसर्गाने भारावलेली असते.हेच वैशिष्ट्य आहे या जागेचं.
प्रत्येक ऋतूत तुम्हाला इथे वेगळा निसर्ग अनुभवायला मिळतो.पाऊस अनुभवावा तो इथेच.कम्माल पाऊस पडतो या भागात.एकदा सुरु झाला की 3-4 दिवस वस्तीला ठरलेलाच.जून च्या सुरवातीला मरगळल्या अवस्थेतले नाले ओढ़े धबधबे या पावसाने आनंदाने फुगू लागतात.जरा रुसलेली वृक्षसंपदा तरारुन येते तसे रानातल्या अम्रीना भर येतो.उगिचच झाडावर राहिलेले चार दोन आंबे- कोकम गळुून जातात.काजूची सुकलेली बोंडे पार कुजतात,
फणसातले ओले् गरे खायला वानरं आणि देवखारी भराभर कुठुुनश्या गोळा होऊन कल्ला करू लागतात.असंख्य वाळवीचे कीड़े आपल पहीलं आणि शेवटचं उड्डाण करतात आणि त्यावर ताव मारायला कोतवाल,कावळे,हुदहुद,वेडे ऱाघु हजर होतात.
पावसाळ्यात कमालीचं वातावरण असतं इथे.आजुबाजूचे धबधबे तर नुसते पहावेत!वेड लागणारे नजारे दिसतात त्यांचे.इथून जवळच असलेला दूधसागर प्रपात,काय वर्णाव त्याचं सौंदर्य! घाटमाथ्याव रून खाली कोसळताना होणारा तो नाद, क्षीरसागराप्रमाणे दिसणारं पाणी, उसळणारे तुषार या केवळ अनुभवण्या सारख्या गोष्टी. पावसाळ्यात लोक सरपटणारे जीव बघायला ख़ास येतात.इथे बरेचसे दुर्मिळ जातीचे सरीसृप आढळतात त्यामुळे यात आवड़ असलेल्यांची चैन असते.सप्टेंबर मधे तर निसर्ग सुंदरतेची परिसीमा गाठतो.पाऊस कमी होऊन छान उन्हं उतरु लागतात तेव्हा,विविधरंगी फुलपाखरांचा विणीचा हंगाम सुरु होतो,आमच्या सदाहरीत वनांच्या खोडावर वेगवेगळे मशरूम आणि चमकणार फंगस दिसायला लागतं.पश्चिम घाट हिरवेकंच असतात.आणि विविध पाना फुलांचा सुवास हवेत भरून राहिला असतो.पठारावर विविधरंगी गवतफुलांची उधळण सुरू असते.
हिवाळ्यात पक्षीनिरिक्षणाचा हंगाम सुरु होतो.अगदी नेचर नेस्ट च्या आवारात तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे पक्षी पहायला मिळतात.इथे पक्षीनिरीक्षणासाठी बाहेरच्या देशातूनही खुप लोकं येतात.फोटोग्राफी आणि निरीक्षण करतात.इथल्या रात्री खूपच सर्द असतात तेव्हा कुटी बाहेर शेकोटी करून बसायची मजाच वेगळी असते.आजुबाजूच्या किर्र जंगलातून येणारे विविध आवाज ऐकत असताना तंद्री लागते.थंडीत इथे सर्वांचा दिवस लवकर उजाड़तो.पनापानांतून दव टपटपत असते आणि बोचऱ्या थंडीत हे अंगावर पडणारे दवबिंदु अक्षरश: गारठवतात.
इथले ऊन्हाळे मात्र थोड़े बाष्पयुक्त असतात.डोंगररांगामध्ये बशी सारख वसल्याने इथे बाष्पाचं प्रमाण खुप जास्त आहे.पण इथे एक गंमत आहे.natural water pool अर्थात नैसर्गिक पोहण्याचा तलाव.इथलं पाणी भुगर्भातील झऱ्यामधुन येत.वर्षभर हे झरे आटत नाहीत आणि त्यात पोहायला कित्ती मजा येते!तसेच इथे natural fish pedicure ही आहे.अश्याच एका झऱ्यात पाय बुडवून बसले की हे छोटे मासे येऊन तुमच्या पायाची कोरडी त्वचा खातात.खरच जाम मज्जा येते तेव्हा. आपल्या इथे असणाऱ्या जीपमधून रात्रीच्या वेळी रानाच्या भोवती फिरून प्राणी बघण्यात एक वेगळीच मजा आहे.नशीब जोरावर असेल तर बरच काही दिसू शकतं.
साधारण मे महिन्याच्या आसपास वळवाच्या पाऊसधारा कोसळतात आणि आजुबाजूची झाडे काजव्यांनी लखलखून जातात.रात्री कुठल्याही झाड़ाकडे पाहिले तर हीे काजव्यांची चमचम डोळयांचेे पारणे फेडते.अशा ऊन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी झाल की या आवारात बिबट,गवे,रानमांजर,सांबराच येण नित्याचच.
अजुन एक खासियत आहे इथली, ते म्हणजे इथलं जेवण.आहाहा,मत्स्यप्रेमींसाठी मेजवानीच जणू.एकदा चाखलेले पदार्थ विसरणे अशक्य.तसेच खास गोवन पदार्थही अप्रतिम असतात इथे.शाकाहा्रींसाठी रानंभाज्यांची पर्वणी असते आणि इथला कर्मचारी वर्ग सगळं आपुलकीने करतो त्यामुळे घरापासून लांबचं आपल दूसरं घरच वाटत इथे आल्यावर लोकांना.
इथल्या वनकुटीही अगदी साध्या पण प्रशस्त आहेत.टीव्ही,एसी अश्या गोष्टी नसल्याने आपण निसर्गाच्या अजुन जवळ जातो.पडवीत बसलं की हळूच इथेतिथे डोकावणारे पक्षी दिसतात.डोळ्यांना जणू हिरवे सुख शीतल छाया देऊन जात.बघाव तिथे हिरव्या रंगाच्या छटा आणि त्यातून डोकावणाऱ्या कुटींची लालचुटुक कौले सुखावतात.इथल्या वाटा असंख्य झुडुुपांच्या वेलींंच्या मधून विंणल्या गेल्या आहेत.पाटाचं पाणी खळाळत वाहत असतं.इथे कुठुुनही तुम्ही विहंगावलोकन केलत तर कोकणातल्या एखाद्या तैलचित्राचा कॅनवास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. सुखद हिरवी गर्द झाडी,पानाफुलांचा सुवास ,खळाळत वाहाणारं पाणी ,आपुलकीनी अदबीने वागणारे कर्मचारी तुमचं इथल वास्तव्य खचितच आनंददायी करतात.अगदी कुठल्याही ऋतूत तुम्ही इथे या. सुट्टी घालवण्यासाठी ,आराम करण्यासाठी ,वन्यप्राणी-पक्षी पाहण्यासाठी ,साप कीड़े निरीक्षणासाठी.तुम्हाला इथे फक्त आनंदच मिळतो. परत शहराकडे किवा तुमच्या गावाकडे जाण्यासाठी निघालेले तुमचे पाय एकवेेळ परत इथे घुटमळतात पण ते नक्की परत येण्यासाठीच असतात. हा निसर्गखजीना तुम्ही तुमच्या आठवणीच्या झोळीत नक्कीच जतन करून ठेवता. काही दिवसांनी झोळी रिकामी झाली की तुमचे पाय आपोआप इथे वळतात हे नक्की.
आम्हाला यायला नक्की आवडेल.१५ २० कौटुंबिक सदस्यांचे गेट टुगेदर करु शकतो कां?
Yes! Definitely!